मुक्त , दूरस्थ शिक्षणातून महिला सक्षमीकरण Free, Women in distance education



    व्यक्तीच्या सर्वकष विकासासाठीची मूलभूत गरज म्हणजे शिक्षण , शिक्षणाने व्यक्ती नि समाज सक्षम होऊन देशाच्या विकासात ते सहाय्यभूत ठरत असतात . देशाची आर्थिक वृद्धी व सामाजिक बदलासाठीही शिक्षण आवश्यक असते . देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी व सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करण्यात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची आहे . चीननंतर जगात सर्वात मोठी शिक्षणव्यवस्था भारताची आहे . भारतात मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू करून महात्मा जोतिराव आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई ह्या युगप्रवर्तक फुले दाम्पत्याने महिला सक्षमीकरणाची वाट खुली केली . शिक्षण हेच महिला सक्षमीकरणाचे आद्य साधन आहे . भारतीय महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी मिळाल्यानंतर केंद्र तथा राज्य सरकारांनी अनेक योजना आखल्या . अनेक उपक्रम राबविले . सुरुवातीच्या काळात महिलांमधली साक्षरता वाढवण्यासाठी केले . ग्रामीण , आदिवासी भागाच्या तसेच दलित मागासवर्गीय समाजाच्या मुलींकडे विशेष लक्ष दिले . यात आश्रमशाळा , वसतिगृहे , शुल्क माफी , मध्यान्य भोजन , गणवेश वाटप , पाठ्यपुस्तकांचे वितरण यांसारख्या सोयीसुविधा निर्माण केल्या . महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केवळ मुलींसाठी स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन केली . कालांतराने ह्या संस्थेचे रुपांतर विद्यापीठात झाले . 
                                           
डॉ . प्रवीण घोडेस्वार
 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक

      मुलींसाठी स्थापन झालेले भारतातले पहिले विद्यापीठ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते . महिलांचे शिक्षण व आरोग्य यांचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे . शिक्षणाने महिला स्वत : च्या आरोग्याबाबत जागरूक झाल्या . आपल्या क्षमता व कौशल्य विकसित झाल्याने त्या आत्मनिर्भर झाल्या . भिंतीआडचे जीवन सोडून मोकळ्या अवकाशात त्यांनी भरारी घेण्यास सुरू केले . त्या देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे नि उल्लेखनीय योगदान देत आहेत . महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दूरस्थ शिक्षणप्रणाली महत्त्वाची आहे . दूरस्थ शिक्षण म्हणजे काय , याचा विचार करू इंग्रजीतल्या Distance Education संकल्पनेचे मराठी रूपांतर म्हणजे दूरस्थ शिक्षण . शिक्षणाचा विचार करताना दूरस्थ म्हणजे जेथे शिकणारा व शिकवणारा एकमेकांसमोर उपस्थित नाहीत . शिकण्याची इच्छा असणारी व्यक्ती तिचे दैनंदिन काम सांभाळून आहे ठिकाणी शिकते , यासाठी विशिष्ट पद्धतीने लिहिलेल्या अध्ययन साहित्याचा उपयोग करत असते . मल्टीमीडिया ( वेब साईट , ब्लॉग , डिस्कशन फोरम , वेगवेगळे अॅप्स , रेडिओ , इ . ) चा उपयोग करते . यानंतर तिला आलेल्या अडचणी , शंका , उद्भवलेले प्रश्न यांच्या निरसनासाठी निर्धारित दिवशी निवडलेल्या अभ्यासकेंद्रावर जाते . तेथे संबंधित विषयाच्या अध्यापकाकडून अडचणी सोडवून घेते . अशा पद्धतीने दूरस्थ शिक्षण पद्धतीत अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया घडून येत असते . कधी कधी मुक्त अध्ययन आणि दूरस्थ शिक्षण ह्या दोन संकल्पना एकत्रित वापरल्या जातात दोन्हीचे संयुक्त रूप म्हणून ' मुक्त आणि दूरस्थ शिक्षण असेही म्हटले जाते . वस्तुत : मुक्त अध्ययन ही तत्त्वप्रणाली असून दूरस्थ शिक्षण ही पद्धती आहे . ज्याला शिकायचे आहे , त्यास याचा लाभ घेता येतो यासाठी कमाल वयोमर्यादा नाही . आपल्या सोयीनुसार अध्ययन करता येते . शिक्षणक्रम / अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुबलक कालावधी असतो . वर्गात प्रत्यक्ष उपस्थितीचे बंधन नसते . नोकरी , व्यवसाय करणाऱ्यांना याचा फायदा होतो . विषय तज्ज्ञांचे दर्जेदार अध्ययन साहित्य पुरवले जाते . ही पुस्तके स्वयंनिर्देशित पद्धतीने लिहिलेली असतात . त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही कोणीतरी आपल्याशी संवाद साधत आहे असे वाटते . पद्धतीत केवळ पुस्तके वाचून अभ्यास करायचा असतो नाही तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही लाभ अध्ययनार्थीना घेता येतो . यासाठी अभ्यासकेंद्राची उपलब्धता हेदेखील प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे . अभ्यासकेंद्र म्हणजे असे ठिकाण जेथे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा आणि मार्गदर्शक प्राध्यापक उपलब्ध असतात . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांना दूरस्थ शिक्षण पद्धतीत संमंत्रक ' संबोधले जाते . ही अभ्यासकेंद्रे बऱ्याचदा पारंपरिक विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यरत असतात . ह्या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करता शिक्षणाची ही पद्धती मुली व महिलांसाठी अतिशय उपयुक्त नि पूरक आहे असे दिसून येते . देशाच्या एकूण लोकसंख्येचा अर्धा हिस्सा महिलांनी व्यापलेला आहे , पण पुरुषांच्या तुलनेत त्यांचा उत्पादक कामात फार कमी सहभाग आहे . याचे कारण म्हणजे त्यांच्यातली साक्षरता व शिक्षणाचे प्रमाण . कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप करायचे झाल्यास त्या देशातल्या महिला किती शिक्षित आहेत ते पाहणे महत्त्वाचे असल्याचे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे . यावरुन ते महिलांच्या शिक्षणाला किती महत्त्व देतात हे लक्षात येते . मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीने महिलांना आपली शैक्षणिक प्रगती करणे सहज शक्य आहे . 
        कारण यासाठी त्यांना अभ्यासासाठी अभ्यासकेंद्रावर रोज उपस्थित राहण्याची गरज नाही . रोजचे कामकाज सांभाळून अभ्यास करू शकतात . एखादा शिक्षणक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण झालाच पाहिजे , असा दबाव नसतो . आपल्या सवडीने आवडीने त्या शिकू शकतात . शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो . त्यांना प्राप्त होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते त्यांची क्षमता व कौशल्ये वृद्धिंगत होतात . त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते . कुटुंबात नि समाजात त्यांना आदराचे स्थान प्राप्त होते . त्यांचे संवाद कौशल्य प्रभावी होते . त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो . जीवनातल्या विविध आव्हानांना सामोरे जायला बळ मिळते . वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात निर्भयपणे वावरता येते . आपल्या हक्क व अधिकारांविषयी जागरुकता येते . रोजच्या नागरी समस्या उदा . पिण्याचे पाणी , सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता , किमान वेतन कायदा , शिक्षणाच्या सोयीसुविधा , महिलांचे शोषण , अन्याय - अत्याचार , कौटुंबिक हिंसाचार , अन्नपदार्थ भेसळ , प्रदूषण , पर्यावरण संरक्षण , बालकांचे हक्क यांसारख्या मुद्द्यावर महिला सजग होताना दिसतात . शिवाय तंत्रज्ञान वापरण्यामागची भीतीदेखील नाहीशी होते . एकूणच विचार केला असता असे स्पष्ट होते की महिलांच्या सक्षमीकरणात ' मुक्त आणि दूरस्थ शिक्षण ' पद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे , यात दुमत नाही . आपल्या राज्यात गेले ३१ वर्षे हे कार्य नाशिकस्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अव्याहतपणे करून राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत उल्लेखनीय योगदान देत आहे . विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यात यंत्रणा निर्माण केली आहे . राज्यातल्या महसूल विभागाच्या मुख्यालयात ( मुंबई , नाशिक , पुणे , कोल्हापूर , नागपूर , अमरावती , औरंगाबाद , नांदेड येथे ) विद्यापीठाचे विभागीय केंद्रे सुरु केली आहेत . नाशिक येथील मुख्यालय , आठ विभागीय केंद्रे व संपूर्ण महाराष्ट्रात असलेली शिक्षणक्रमानिहाय अभ्यासकेंद्रे अशा रीतीने विद्यापीठाचे काम सुरु आहे .


0/Post a Comment/Comments